पुणे | ६ मे २०२६ – राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, श्री चंद्रकांतदादा पाटील मा. मंत्री उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) च्या नवीन सुधारीत संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले.

या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, मा. श्री. बी. वेणुगोपाल रेड्डी, भाप्रसे, उच्च शिक्षण विभागाचे संचालक आणि MSFDA चे कार्यकारी संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक मा. डॉ. विनोद मोहितकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, तसेच उच्च शिक्षण विभाग व MSFDA संस्थेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

MSFDA ही संस्था राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापक, शैक्षणिक नेतृत्व, यांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असून, गुणवत्ता-वृद्धी, क्षमता विकास आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबवत आहे. राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये आधुनिक अध्यापन पद्धती, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि बहुविद्याशाखीय दृष्टीकोन रुजविण्यासाठी MSFDA महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

www.msfda.ac.in या संकेतस्थळाद्वारे MSFDA च्या सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नोंदणी प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. संबंधितांना स्वतःची प्रोफाइल तयार करून प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी थेट नोंदणी करता येणार असून, कार्यक्रमांचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, सूचना आणि शैक्षणिक संसाधने एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहेत. यामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेगवान होणार आहे.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सहभागींसाठी प्रमाणपत्र देण्याची सुविधा देखील डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे व्यवस्थापन सुलभ झाले आहे.

MSFDA कडून विविध संस्थांबरोबर सामंजस्य करार (MoU) करून प्रशिक्षण कार्यक्रमांची गुणवत्ता आणि व्याप्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे. या सहकार्याच्या माध्यमातून उद्योग, शैक्षणिक संस्था आणि तज्ज्ञ यांच्यात समन्वय साधून अधिक परिणामकारक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे.

हे संकेतस्थळ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, सतत व्यावसायिक विकास, डिजिटल शिक्षण आणि शैक्षणिक प्रशासन यांना चालना देणारे आहे. NEP 2020 अंतर्गत अपेक्षित असलेले शिक्षक सक्षमीकरण आणि संस्थात्मक परिवर्तन यासाठी MSFDA ची भूमिका अधिक बळकट होणार आहे.

यापुढे MSFDA चे सर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नोंदणी ही www.msfda.ac.in या संकेतस्थळाद्वारेच करण्यात येणार असून, राज्यातील सर्व संबंधित घटकांनी या संकेतस्थळाचा नियमित व सक्रीय वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.